पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मध्यस्थीनंतर सुशिल आमुणेकर यांचे उपोषण स्थगित

आरोग्यविषयक मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक आश्वासन
​
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील सुधारणा, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी, ट्रामा केअर युनिटची सक्षमता आणि रिक्त वैद्यकीय अधिकारी पदांची तत्काळ भरती या प्रमुख मागण्यांसाठी कारिवडे (ता. सावंतवाडी) येथील सामाजिक कार्यकर्ते सुशिल आमुणेकर यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेले ठोस आश्वासन आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने आरोग्य उपसंचालकांमार्फत शासनाला प्रस्ताव पाठवण्याचे दिलेले लेखी पत्र यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

​उपोषण सुरू झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन श्री. आमुणेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना पालकमंत्री राणे यांनी उपोषणकर्त्यांची मागणी अत्यंत रास्त असल्याचे सांगत, या प्रकरणावर तातडीने तोडगा काढण्यासाठी लवकरच विशेष बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन दिले.

​तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. चिपळूणकर यांनीही उपोषणकर्त्यांशी संवाद साधून प्रशासकीय पातळीवरील कारवाईची माहिती दिली. राज्यातील १४४० रिक्त वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राधान्याने वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधान सचिव (आरोग्य) यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. यासोबतच १०८ रुग्णवाहिका सेवा आणि ट्रामा केअर युनिट सक्षमतेने कार्यान्वित करण्यासंदर्भात आरोग्य उपसंचालक (कोल्हापूर) यांच्यामार्फत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

​मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भात बोलताना प्रशासनाने सांगितले की, हॉस्पिटलच्या जागेचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट असून २० ऑगस्ट रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. न्यायालयातील जागेचा हा प्रश्न सुटताच हॉस्पिटलच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होईल. ​जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने सर्व मागण्यांचा सकारात्मक पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिले. पालकमंत्री नितेश राणे यांचे तोंडी आश्वासन, आरोग्य उपसंचालकांना पाठवलेले अधिकृत पत्र आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका या सर्व बाबींचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते सुशिल आमुणेकर यांनी आपले उपोषण तूर्त स्थगित करत असल्याचे जाहीर केले.