टेरवचे माजी पोलिस पाटील धोंडजीराव कदम यांचे निधन

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील टेरव गावचे माजी पोलिस पाटील धोंडजीराव (आबा) सखारामराव कदम यांचे शुक्रवार दि. १४ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी ते ९७ वर्षांचे होते. पंचक्रोशीत ते प्रेमाने ‘आबा’ या नावाने परिचित होते.
टेरव गावचा चालता-बोलता इतिहास आणि गावच्या सामाजिक जीवनाचे साक्षीदार असलेले एक ज्येष्ठ, अनुभवी व दसपटीतील आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. पोलिस पाटील म्हणून त्यांनी अनेक वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली. गावातील शांतता, सामाजिक सलोखा, एकोपा आणि ग्रामस्थांच्या हितासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. ग्रामस्थांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. आपल्या साध्या, प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने टेरव गावाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक, अनुभवी व्यक्तिमत्त्व आणि गावच्या इतिहासाचा एक जिवंत दुवा गमावला आहे. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे, पणतवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, सगे-सोयरे, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.