आमदार किरण सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन, मान्यवरांची उपस्थिती
लांजा (प्रतिनिधी) कोकणातील एक प्रमुख पीक असलेल्या काजू च्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या काजू प्रक्रिया उद्योग युनिटचा भूमिपूजन सोहळा आज रविवारी उत्साहात पार पडला. आमदार किरण सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
लांजा तालुक्यात आंबा तसेच काजू या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी काजू पीक फायदेशीर ठरत आहे. आणि म्हणूनच तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासोबतच त्यांच्या काजू उत्पादनाला योग्य बाजारपेठ, चांगला दर आणि स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योगाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केवळ कच्चा काजू विकण्याऐवजी त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होऊ शकते. ही गरज लक्षात घेऊन कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून काजू प्रक्रिया उद्योग उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
भूमिपूजन झाल्यानंतर बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे प्रक्रिया उद्योग महत्त्वाचे आहेत. लांजा तालुक्यात काजू उद्योगाची मोठी क्षमता असून या क्षमतेचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
या उद्योगामुळे काजू हंगामात स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे. महिलांना काजू सोलणे, ग्रेडिंग, पॅकिंग आदी कामांमध्ये रोजगार मिळू शकतो. तसेच युवकांना प्रक्रिया उद्योग, व्यवस्थापन, मार्केटिंग, लॉजिस्टिक्स आणि विक्री क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, भूमिपूजन कार्यक्रमाला लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, जिल्हा परिषद सदस्य लीला घडशी, रसिका मेस्त्री, जिल्हा बँक संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, मनोज चंदुरकर, विजय भगते, कंपनीचे चेअरमन आनंद कांबळे, संचालक गणेश खानविलकर, सचिन जाधव, राजेंद्र पालये, श्वेता पन्हाळकर,, सचिन माजळकर, संतोष साटले यांच्यासह कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी व संचालक, काजू उत्पादक शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













