खोटले येथील ‘आपला बाप्पा’ समोर मराठा शौर्याचा जिवंत इतिहास!

▪️युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा देखव्यातून गौरव    

मसुरे | झुंजार पेडणेकर

श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले येथे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत अभूतपूर्व आणि राष्ट्रभिमानाने ओसंडून वाहणाऱ्या वातावरणात साजरा होत आहे. येथील मठाधिपती श्री. गणेश घाडीगावकर यांच्या ‘आपला बाप्पा’ समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या १२ गड-किल्ल्यांचा भव्य आणि अभ्यासपूर्ण देखावा साकारण्यात आला आहे.

‘मराठा शौर्याचा जागतिक गौरव’ ही मध्यवर्ती कल्पना ठेवून तयार करण्यात आलेल्या या देखाव्यात गड-किल्ल्यांच्या माहितीसोबतच अत्याधुनिक ध्वनी-प्रभावांचा सुरेख वापर करण्यात आला आहे.आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या गर्जनांनी संपूर्ण परिसर शिवकालीन पराक्रमाच्या आठवणींनी जिवंत होतो.

कट्टा येथील राष्ट्रीय ख्याती असलेले सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री समीर चांदेरकर यांच्या हस्तकलेतून साकारलेली बाप्पाची आकर्षक आणि भावूक मूर्ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.अनुभव प्रिंटर्स (कणकवली) यानी डिजिटल आणि वास्तववादी देखाव्याची निर्मिती करून त्यांनी किल्ल्यांचे स्वरूप हुबेहूब साकारले आहे.

११ दिवसांच्या उत्सवात भाविकांना हा ऐतिहासिक वारसा जवळून पाहण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.

देखाव्यात समाविष्ट असलेले युनेस्को नामांकित १२ जागतिक वारसा किल्ले रायगड, राजगड, शिवनेरी,

प्रतापगड, सिंहगड, पन्हाळा, विशाळगड,

लोहगड, सलहेर,

सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग,

जिंजी किल्ला उभारण्यात आले आहेत.

श्री क्षेत्र खोटले येथील हा ११ दिवसांचा गणेशोत्सव केवळ धार्मिक सण न राहता, भावी पिढीला मराठा इतिहास आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाची ओळख करून देणारे एक शैक्षणिक आणि प्रेरणादायी केंद्र बनले आहे. स्थानिक नागरिक व भाविक मोठ्या संख्येने या ‘आपला बाप्पा’ आणि ऐतिहासिक देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत.