‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’द्वारे सुरक्षित बालपण, सजग विद्यार्थी व सक्षम भविष्याचा संदेश
मंडणगड प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची मोठी गर्दी होत असताना रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून विविध सामाजिक व सुरक्षिततेच्या विषयांवर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडप व सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर बॅनर लावून नागरिक तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत माहिती देण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ या उपक्रमातून ‘सुरक्षित बालपण, सजग विद्यार्थी, सक्षम भविष्य’ हा संदेश देण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांना सजग व जबाबदार नागरिक बनविण्यासाठी मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार टाळणे, महिला व बालकांची सुरक्षितता, रस्ते अपघातांपासून बचाव, आग लागल्यास तातडीची मदत तसेच विविध आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत घेण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
यासाठी ‘मुसीबत हजार, ११२ हर बार’ हा संदेश देत आपत्कालीन परिस्थितीत ११२ हा एकत्रित आपत्कालीन मदत क्रमांक असल्याची माहितीही बॅनरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. गुन्हेगारी, अपघात, अग्निशमन, महिला सुरक्षा यांसह विविध आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा उत्सव आनंदाचा असला तरी त्यासोबत नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाकडून जनजागृतीवर विशेष भर दिला जात असल्याचे या अभियानातून दिसून येत आहे. मंडणगड पोलीस ठाण्याचे हद्दीत पोलीस निरीक्षक श्री धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थानरातील कर्मचारी जनजागृती अभियानात सहभागी झाले आहेत
फोटो ओळी
कुणबी भवन सार्वजनिक गणेशोत्सवात जनजागृती अभियानात माहीती पोलीस निरीक्षक श्री धुमाळ व कर्मचारी











