भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतले आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीचे आशीर्वाद !

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूरचे अतिरिक्त महासंचालक दिनेश व्ही. गणवीर, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण पुणेचे उप महासंचालक डॉ. बिभास सेन, वरिष्ठ भूवैज्ञानिक कैलास व्हटकर तसेच भूवैज्ञानिक सागर व्हटकर यांनी आंगणेवाडीला भेट देऊन श्री भराडी देवीचे दर्शन घेतले व देवीचा आशीर्वाद घेतला.

या विशेष भेटीदरम्यान आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व आंगणे कुटुंबियांच्या वतीने सर्वांचे उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. तसेच श्री भराडी देवीचा प्रसाद व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, कार्याध्यक्ष बाळा आंगणे, बाबू आंगणे, पंकज आंगणे यांच्यासह आंगणे कुटुंबियातील इतर सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूवैज्ञानिक सर्वेक्षणातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आंगणेवाडीला भेट देऊन श्री भराडी देवीचे दर्शन घेतल्याबद्दल आंगणे कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. दर्शन घेतल्यानंतर उपस्थितांनी मंदिराचा इतिहास, परिसराचे वैशिष्ट्य आणि देवस्थानच्या परंपरेबद्दल अधिकाऱ्यांना माहिती दिली.