चिपळूण (प्रतिनिधी) : ‘खेर्डीचा राजा’ विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळ, खेर्डी-चिपळूण यांच्या वतीने स्व. सौ. नेहा अजित दाभोळकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली चिपळूण तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी खेर्डी-विठ्ठलवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत सुमारे ८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
खेर्डीत प्रथमच अशा स्वरूपाच्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक अनिल दाभोळकर, डॉ. अजित दाभोळकर, जिल्हा बँकेच्या संचालिका दिशा दाभोळकर, मंडळाचे आधारस्तंभ दशरथ दाभोळकर, माजी उपसरपंच अभिजीत खताते, डॉ. रजत दाभोळकर, डॉ. श्रुती दाभोळकर, राकेश दाभोळकर, रियाज खेरडकर, प्रणाली दाभोळकर आदींच्या उपस्थितीत झाले. स्पर्धा इयत्ता पहिली ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला अशा तीन गटांत घेण्यात आली. पहिली ते सातवी गटात मार्मिक मांडके, निलेश भाटी, वेदांत शिंदे, श्रीराज चांदे व अर्णव कांबळे यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळविले. आठवी ते दहावी गटात श्लोक घाग, विपिन सावंत, सोहम अभ्यंकर, अनुष्का विश्वकर्मा व आदित्य कांबळे यांनी यश मिळविले. खुल्या गटात साहस नारकर, प्रवीण सावर्डेकर, ओम चव्हाण, वैभव गुरव व खुशी विश्वकर्मा यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकावले. विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्वात लहान खेळाडू जुई देवळेकर व शर्विल वरवाटकर, तसेच सर्वात ज्येष्ठ खेळाडू गिरीश करमरकर व स्वरदा खोत यांनाही विशेष सन्मान करण्यात आला.
सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षीस वितरण सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, डॉ. रजत दाभोळकर व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. डॉ. रजत दाभोळकर यांनी आपल्या मातोश्री स्व. नेहा अजित दाभोळकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुरस्कृत केली होती. स्पर्धेचे तांत्रिक सहकार्य प्रवीण सावर्डेकर, रश्मी प्रवीण सावर्डेकर व प्रतिरंग चेस ॲकॅडमी, मार्कंडी यांनी केले. पंच म्हणून श्रीहास नारकर व साहस नारकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन झाल्याने पालक व स्पर्धकांनी समाधान व्यक्त करून दरवर्षी अशा स्पर्धेचे आयोजन करण्याची मागणी केली. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे, खजिनदार बाळू कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.












