अखेर प्रशासनाला जाग, लांजा तालुक्यातील नुकसानी क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश

तालुक्यातील १२३ गावातील नुकसानीच्या नोंदी व पंचनाम्या साठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका

संतोष कोत्रे
लांजा: तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या प्रचंड नाराजीनंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून तालुक्यातील खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करण्यासाठी शासन स्तरावर ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांची ग्रामस्तरीय संयुक्त पंचनामे पथके गठीत करण्यात आली आहेत.
सुरुवातीला दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून लांजा तालुक्याचे नाव वगळण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. लांजा तालुक्यात दुष्काळामुळे भात शेती तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने लांजा तालुक्याला या यादीतून का वगळण्यात आले? जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे का? असा सवाल देखील शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात होता. हा एक प्रकारे लांजा तालुक्यावर अन्याय असल्याचे देखील शेतकरी वर्गाचे म्हणणे होते.
या पार्श्वभूमीवर अखेर पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार लांजा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी ,सहाय्यक कृषी अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांची ग्रामस्थरीय संयुक्त पंचनामे पथके गठीत करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे खरीप हंगाम २०२६ मधील पिकांचे पंचनामे करून पिकांच्या विशिष्ट छायाचित्र तसेच सर्व माहिती व आकडेवारी शासन निर्णयातील नमुन्यातील प्रमाणपत्रात सादर करण्याचे देखील सूचना करण्यात आलेले आहेत. तसेच नेमून दिलेल्या त्या-त्या गावातील शेतकरी लाभापासून वंचित राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्याला या प्रकरणी जबाबदार धरण्यात येईल अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत.
याबाबतचे परिपत्रक तहसीलदार प्रियांका ढोले, तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार तसेच गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी यांनी जारी केले आहे. लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रासह तालुक्यातील १२३ गावातील खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे या गठीत करण्यात आलेल्या पथकांद्वारे करण्यात येणार आहेत.
त्यामुळे उशिरा का होईना परंतु दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून नाव वगळलेल्या लांजा तालुक्यातील शेतकरी वर्गाला एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.