सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कोणताही अपहार झालेला नसताना शिवसेनेच्या नगरसेवकांकडून चुकीची माहिती देऊन पालिकेची नाहक बदनामी केली जात आहे, असा घणाघाती आरोप नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी केला. पालिका बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
पत्रकार परिषदेत माहिती देताना नगराध्यक्षा भोसले म्हणाल्या की, पाणीपुरवठा विभागातील काही संशयास्पद बाबी निदर्शनास आल्यानंतर संबंधित बिले तात्काळ रोखण्यात आली आहेत. या विभागातील प्रशासक काळापूर्वीचे आणि प्रशासकीय काळातील सर्व रेकॉर्ड्स ‘थर्ड पार्टी ऑडिट’द्वारे तपासले जाणार असून, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेतली जाणार आहे.
अपहाराच्या चुकीच्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार सभापती प्रतीक बांदेकर यांचा तात्पुरता राजीनामा घेण्यात आला आहे. बांदेकर हे पूर्णपणे निर्दोष असून त्यांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, त्यामुळे लवकरच त्यांना पुन्हा सन्मानाने सभापतीपद दिले जाईल.
शिवसेनेचे पदाधिकारी अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करत असून नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
नगराध्यक्षा पुढे म्हणाल्या की, आजच्या बैठकीत समोर आलेल्या काही नवीन बाबींची सखोल चौकशी केली जाईल. तसेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली असून लवकरच नवीन मुख्याधिकारी मिळतील अशी आशा आहे. शहरात दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, प्रशासकीय काळात अखर्चित राहिलेला सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी शासनाकडे परत गेला असून, तो पुन्हा पालिकेला मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय विस्थापित झालेल्या स्टॉलधारकांना लवकरच योग्य ठिकाणी पुनर्वसित केले जाईल, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली.
या पत्रकार परिषदेला सभापती सुधीर आडीवरेकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, नीलम नाईक, सुनिता पेडणेकर आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.












