दुरुस्तीवर पुन्हा लाखो रुपये खर्च होत असल्याने आरोग्य समितीत शंका व्यक्त!
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग नगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दहा लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेल्या वॉशिंग मशीनच्या दुरुस्तीवर पुन्हा लाखो रुपये खर्च करावे लागल्याचा मुद्दा जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. या खरेदीबाबत वैद्यकीय महाविद्यालयाकडून समाधानकारक खुलासा मिळाला नसल्याने प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन चौकशी करावी आणि सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश आरोग्य समितीचे सभापती प्रितेश राऊळ यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची सभा झाली. यावेळी समिती सदस्या सावी लोके, यज्ञा साळगावकर, सुनील पारकर, संतोष पारकर, रुपेश पावसकर, अवनी तेली यांच्यासह समितीचे सचिव तथा आरोग्य अधिकारी सई धुरी, वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा वैद्यकीय रुग्णालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या वॉशिंग मशीनच्या खर्चाबाबत सदस्य रुपेश पावसकर यांनी प्रश्न उपस्थित केला. दहा लाख रुपये खर्च करून मशीन खरेदी करण्यात आली असताना तिच्या दुरुस्तीसाठी पुन्हा लाखो रुपये खर्च करावे लागले. कपडे धुण्यासाठीही मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ही मशीन कोणत्या कंपनीकडून खरेदी करण्यात आली, संबंधित कंपनीने वॉरंटी दिली होती का आणि दुरुस्तीवर पुन्हा एवढा खर्च का करावा लागला, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन खरेदी, वॉरंटी, दुरुस्ती आणि त्यावरील खर्चाची तपासणी करावी. यासाठी स्वतंत्र समिती नेमून प्राप्त माहितीच्या आधारे सविस्तर अहवाल सादर करावा, असे सभापती प्रितेश राऊळ यांनी स्पष्ट केले.
मीठबाव प्राथमिक आरोग्य केंद्र निवासस्थानांच्या दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराकडून योग्य प्रकारे केले जात नसल्याचा मुद्दा सावी लोके यांनी उपस्थित केला. या कामाची तातडीने माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी सूचना सभापती राऊळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
जिल्ह्यातील सुमारे ५० ते ६० स्मशानभूमींच्या जमिनी खासगी जमीनमालकांच्या नावे असल्याने ग्रामपंचायतींना त्यांच्या दुरुस्तीची कामे करताना अडचणी येत असल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. या स्मशानभूमी सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध राहाव्यात आणि त्यांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा, अशी सूचना करण्यात आली.
गणेशोत्सवात पथकांकडून रुग्णांवर उपचार
गणेशोत्सव काळात नियुक्त करण्यात आलेल्या २२ पथकांच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्यसेवा पुरविण्यात आली. या पथकांनी तापाचे ५२९ रुग्ण आणि अन्य आजारांचे १,६९९ रुग्ण अशा एकूण २,२२८ रुग्णांवर उपचार केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
जिल्हा परिषदेमार्फत शाळा आणि अंगणवाड्यांच्या दुरुस्ती कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. शासनाच्या सूचनांनुसार ही कामे राबविताना शाळा आणि अंगणवाड्यांच्या तपासणी मोहिमेसाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच विविध आरोग्यविषयक कामांचा आणि आजारांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
सुधारित अंदाजपत्रकाच्या आराखड्यात इंधन खरेदी, संवाद यात्रा आणि इतर आरोग्यविषयक कार्यक्रमांसाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आरोग्यसंपन्न गाव’ कार्यक्रमांतर्गत चांगले प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमात निर्धारित ५९ निर्देशकांच्या आधारे आरोग्यविषयक कामांचे मूल्यमापन केले जाते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर जनआरोग्य समित्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त उपक्रम राबवावेत. गावागावांत या कार्यक्रमाची माहिती पोहोचवून नागरिकांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन सभापती प्रितेश राऊळ यांनी केले. आरोग्यसंपन्न गावाचा उपक्रम गांभीर्याने आणि प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.!












