श्रमदानातून बांधले दोन वनराई बंधारे
वैभववाडी प्रतिनिधी :
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी करूळ गावातील वारकरी बांधवांनी दिंडवणेवाडी येथे श्रमदानातून दोन वनराई बंधारे उभारले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे २५ ते ३० वारकरी व ग्रामस्थ सहभागी झाले. वारकरी बांधवांच्या या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे.
वारकरी बांधवांनी श्रमदानातून दगड-मातीचे बंधारे उभारून वाहून जाणारे पाणी अडविले. या बंधाऱ्यांमुळे पाणी जमिनीत मुरून भूजलपातळी वाढण्यास तसेच परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
‘वारीतून भक्ती आणि श्रमदानातून समाजसेवा’ या भावनेतून राबविलेल्या या उपक्रमाला ग्रामपंचायत करूळचे विशेष सहकार्य लाभले. सरपंच नरेंद्र कोलते यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. दिंडवणेवाडी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल वारकरी बांधवांनी आभार व्यक्त केले.
यावेळी वारकरी चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, विजय सावंत, प्रदीप कोलते, प्रदीप मोरे, अविनाश पडवळ, दीपक खोपडे यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.













