वेंगुर्ले येथील शेतकरी, बागायतदार, शास्त्रज्ञ चर्चासत्राला चांगला प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेचे आयोजन
वेंगुर्ले : दाजी नाईक
शेतकरी बागायतदार यांनी सध्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन आंबा काजू व इतर फळ पिके यांचे संरक्षण करण्याकरिता मृद आच्छादनाचा वापर, अनावश्यक फवारणी, पालवी छाटणी करणे, पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन वापर करणे आवश्यक असल्याची माहिती वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे यांनी सविस्तरपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरासन करताना दिले.
वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी बागायतदार यांच्यासाठी चर्चासत्र आयोजित केली होती. या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शिंदे बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय, सचिव महेश चव्हाण, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, तसेच संदीप देसाई, प्रकाश वारंग, रामकृष्ण चिपकर, आग्नेल फर्नांडिस, सतीश मडव, अर्जुन नाईक, प्रदीप सावंत, प्रमोद सावंत, प्रताप गावस्कर, महेश परब, गोविंद परब, दीपक भगत, सुधाकर सावंत, सौ. कीर्तीमंगल भगत यांच्यासह शेतकरी बागायतदार आणि शास्त्रज्ञ उपस्थित होते. यावेळी आंब्या संदर्भात मार्गदर्शन डॉ. आर एम देवारे यांनी केले. तर कीटक शास्त्रज्ञ डॉ. वैशाली झोटे, वनस्पती रोग तज्ञ डॉ. वाय.आर. गोवेकर यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनी एन डी आर एफ च्या बाहेर जाऊन शेतकरी बागायतदारांना आंबा काजू संदर्भात मदत मिळवून दिली त्यामुळे त्यांचा अभिनंदनचा ठराव घेण्यात आला. तसेच फळ संशोधन केंद्राचे संशोधन संचालक डॉ वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
दरम्यान यावेळी पिक पाहणी करून सुद्धा सातबारावर नोंद दिसत नाही त्यामुळे पिक विमा भरण्याकरिता अडचण येते, सन २०२५-२६ मधील पुनर्वी हवामान आधारित फळपीक विम्याची नुकसान भरपाई जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही ती विमा कंपनीने तात्काळ द्यावी. पिक विमा भरण्याकरिता कर्जदाराला कोणती अट ठेऊ नये. सहकार सोसायटी किंवा ग्रामीण बँक मध्ये जरी शेतकऱ्यांचे कृषी कर्ज असले तरी त्या शेतकऱ्याला कोणतीही अट देऊ नये. शेतकरी सीएससी केंद्रावर सुद्धा फळ पिक विमा उतरवू शकतो. आंबा काजू व इतर फळपिक विम्याचे प्रस्ताव कंपनीकडून अंतिम टप्प्यात पाठविले जातात त्याबद्दल शासनाने सदर विमा कंपनीला सूचना द्यावी. सन २०२५-२६ ची आंबा काजू नुकसान भरपाई अजून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खाती आली नाही ती तात्काळ मिळावी. आधी प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करून चर्चा घडवून आणली. तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सध्या परिस्थिती पाहता सर्वांनी पाणी बचतीकडे आणि पाणी साठवणुकीकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. यासाठी साखळी बंधारे बांधणे, गवत काढून बुंदयांवर घालणे, कच्चे बंधारे बांधले आदी उपायोजना करण्यासाठी शेतकरी बागायतदारांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.













