कलेच्या श्रीमंतीने जीवन समृद्ध करा

फाटक हायस्कूलमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रमात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

चिपळूण (प्रतिनिधी) : वाचन, चिंतन, मनन आणि उत्तम संस्कारांतूनच परिपूर्ण माणूस घडत असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या कलाक्षेत्राची निवड करून निरंतर साधना करावी आणि कलेच्या श्रीमंतीने स्वतःचे आयुष्य अधिक समृद्ध करावे, असे विचार ज्येष्ठ कवी व गीतकार प्रवीण दवणे यांनी मांडले. कोकण मराठी साहित्य परिषद आणि दि न्यू एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने फाटक हायस्कूलमध्ये आयोजित ‘लेखक आपल्या भेटीला’ या विशेष उपक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला साहित्यिकांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी विचारमंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी कलावंतांच्या सहवासातूनच नवे कलाकार घडत असल्याचे स्पष्ट करत, शालेय वय हेच अंतस्थ कलागुणांना ओळखण्याचा सुवर्णकाळ असल्याने विद्यार्थ्यांनी पुस्तकी अभ्यासासोबतच कला साधनेलाही तितकेच महत्त्व द्यावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात प्रवीण दवणे यांनी विद्यार्थ्यांना कविता सूचण्यामागचा मनोहारी अनुभव अगदी ओघवत्या व सहज-सोप्या शैलीत उलगडून दाखवला; तसेच ग. दि. माडगूळकर यांच्या अजरामर ‘गीत रामायण’मधील साहित्याचा अवीट गोडवा अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्याचे नियमित श्रवण करावे आणि कोकणातील समृद्ध साहित्यिकांच्या दर्जेदार ग्रंथांचे वाचन करावे, असा मोलाचा सल्ला दिला. दीपप्रज्ज्वलनाने सुरू झालेल्या या सोहळ्यात मुख्याध्यापक राजन कीर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रज्ञा दामले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर यांच्या हस्ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे आणि कोकण युवा मोर्चाचे प्रमुख अरुण मोरये यांचा गौरव करण्यात आला. या साहित्यिक मेळाव्याला संस्थेचे सचिव राजीव गोगटे, मुख्याध्यापक राजन कीर, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये यांच्यासह आजी-माजी शिक्षक आणि मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते; कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विजय गावडे यांनी तर उपस्थितांचे आभार विलास पांचाळ यांनी मानले.