देवरूख (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद- जागर आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालय, देवरुखमधील राष्ट्रीय सेवा योजना(+२ स्तर) विभागामार्फत ‘आरोग्यविषयक मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सायले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकुमार फास्के यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व, आरोग्याची काळजी आणि निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नाली शिर्के यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला श्री. किशोर तुंगार (एम. पी. डब्ल्यू.), श्रीमती पाष्टे(आशा सेविका) आणि श्रीमती कांगणे (आशा सेविका) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वसंत तावडे यांनी केले, तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सीमा कोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. स्वप्नाली झेपले, सहाय्यक अमोल वेलवणकर व श्रीमती रुणाली पवार यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे आणि विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळातील आरोग्यविषयक काळजीबाबत योग्य माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या मार्गदर्शन कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी शुभेच्छा दिल्या.












