चिपळूण (प्रतिनिधी) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने एकता नगर (केवडिया), गुजरात येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भव्य ‘राष्ट्रीय एकता परेड’चे चिपळूण पोलीस ठाणे येथे प्रोजेक्टरद्वारे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. या अनोख्या उपक्रमाला चिपळूणकर नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावर्षीच्या परेडमध्ये प्रामुख्याने देशातील सशस्त्र नक्षलवादापासून मुक्तीच्या ऐतिहासिक यशावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. पूर्वी नक्षलवाद प्रभावित राहिलेल्या १२६ जिल्ह्यांतील सुमारे २,००० कलाकारांनी सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे तेथील संघर्ष आणि विकास दर्शवला. तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि राज्य पोलिसांच्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तुकड्या, कोब्रा (CoBRA) महिला कमांडोज आणि महिलांच्या नेतृत्वाखालील ‘गार्ड ऑफ ऑनर’द्वारे जबरदस्त महिला शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या थीमला अनुसरून देशाची सांस्कृतिक विविधता आणि अखंडतेचा संदेश देणारे १५ हून अधिक आकर्षक चित्ररथ या परेडमध्ये सामील होते. BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB च्या जवानांचे शिस्तबद्ध संचलन, थरारक मोटरसायकल साहसी प्रात्यक्षिके आणि भारतीय हवाई दलाचा (IAF) भव्य फ्लायपास्ट हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेला सोहळा चिपळूणकरांना थेट पाहता आला.
सदर राष्ट्रीय एकता परेडचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, इतर पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच सैनिक हॉस्टेलचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि चिपळूणचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी चिपळूण पोलिसांचे आभार मानले.













