मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
वैभववाडी येथे अधीक्षक संजय रावराणे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न
वैभववाडी l प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आम्ही महाविद्यालयात काम केले. संस्थेने वेळोवेळी सोपविलेल्या जबाबदाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. या महाविद्यालयामुळे अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास मदत झाली, याचा सार्थ अभिमान आहे. संस्थेने काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी संस्थेचा कायम ऋणी राहीन. सेवानिवृत्त होत असलो तरी यापुढेही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय राहणार आहे, असा विश्वास आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे अधीक्षक संजय रावराणे यांनी व्यक्त केला.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे अधीक्षक संजय रावराणे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा येथील वृंदावन रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत असलेल्या संजय रावराणे यांना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी माजी आमदार राजन तेली, वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे, संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, शांताराम काका रावराणे, प्रभानंद रावराणे, विजय रावराणे, प्राचार्य काशिनाथ चव्हाण, डॉ. सी. एस. काकडे, राजेंद्र राणे, स्नेहल रावराणे, प्रफुल्ल सुद्रिक आदी उपस्थित होते.
माजी आमदार राजन तेली म्हणाले, संजय रावराणे यांच्या कार्याचा आवाका आणि त्यांनी मिळवलेला जनसंपर्क उपस्थितांच्या मोठ्या संख्येवरून स्पष्ट होतो. त्यांनी यापुढेही तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान द्यावे. सभापती सिद्धेश रावराणे यांनी, कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असावा, याचे संजय रावराणे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. माजी सभापती जयेंद्र रावराणे यांनी नावळे ते वैभववाडी असा संजय रावराणे यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या वाटचालीत अनेक संकटे आली; मात्र त्यांनी समर्थपणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या, असे गौरवोद्गार काढले. यावेळी सुधीर नकाशे, संतोष कदम, संतोष टक्के यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय रावराणे यांच्या ३४ वर्षांच्या सेवाकार्याचा आढावा घेणारे सादरीकरण (पीपीटी) उपस्थितांना दाखविण्यात आले. त्यानंतर संजय रावराणे यांनी पत्नी नेहा रावराणे व कुटुंबीयांसमवेत केक कापून आनंद व्यक्त केला. उपस्थित महिलांनी त्यांचे औक्षण केले.
यावेळी नावळे ग्रामस्थ, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, वैभववाडी भाजपा तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार राजन तेली, सिद्धेश रावराणे, सदानंद रावराणे व जयेंद्र रावराणे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासूनच नागरिकांनी कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. वृंदावन रिसॉर्ट उपस्थितांनी खचाखच भरले होते. संजय रावराणे परिवाराच्या वतीने सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कारेकर यांनी केले.













