चिपळूण (प्रतिनिधी) : परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला. या दिनाप्रसंगी मुख्याध्यापक श्री. शिंदे यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी श्री. शिंदे यांनी राज्यघटनेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. चांदे यांनी केले. दुपारी संविधान सन्मान समिती जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने संविधान सन्मान रॅलीचे आयोजन चिपळूण शहरात करण्यात आले होते, त्यांनी या रॅलीमध्ये १४ शिक्षण संस्थांतून सभेचे आयोजन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून ही रॅली परांजपे हायस्कूलमध्ये आली होती. परांजपे हायस्कूलच्या क्रीडांगणावर या रॅलीचे झांज पथकाच्या साह्याने स्वागत करण्यात आले. रॅलीमधील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना राज्यघटनेविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या वतीने राज्यघटनेची एक प्रत शाळेला भेट म्हणून देण्यात आली. त्याचा स्वीकार मुख्याध्यापक श्री. शिंदे यांनी केला. मान्यवरांचे आभार श्री. चांदे यांनी मानले. शाळेमध्ये संविधानावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची लिखित स्वरूपात स्पर्धा घेण्यात आली होती, यामध्ये शाळेतील ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.













