चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबडस या विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रथमता मुख्याध्यापक वसंत यादव यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
विद्यालयातील सहाय्यक शिक्षक भास्कर महाडिक यांनी आपल्या भाषणातून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतात याविषयी माहिती सांगितली. यामध्ये त्यांनी आपले मत व्यक्त करताना संविधान तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले याविषयी माहिती सांगितली. तसेच भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० पासून लागू झाले. तसेच संविधानामुळे आपली लोकशाही व्यवस्था मजबूत होते. संविधानामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होते. नागरिकांच्या हक्कांची जाणीव होते. बंधुभाव एकता निर्माण होते. संविधानामुळे आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्य शिकवली. भारतीय संविधान हा आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा आहे. तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाला समान हक्क व न्याय मिळतो, म्हणून आपण सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे. समानता हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आपल्याला मिळाले आहेत याची जाणीव होते, याविषयी आपले विचार व्यक्त केले. याचबरोबर संविधानाचे उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. सहाय्यक शिक्षक कृष्णकांत कुंभार यांनी आभार मानले.













