२५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबडस या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने विद्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. घरडा केमिकल्स प्रा. लि.सी.एस.आर उपक्रमांतर्गत यांच्या मुख्य आयोजनातून पार पडलेल्या या शिबिरात सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल घडविताना त्यांचे शारीरिक आरोग्य उत्तम राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन प्रमुख आरोग्य तपासणी विभागांची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, खेड यांच्या वतीने डॉ. तुकाराम अडुलकर यांनी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली. डोळ्यांचे आरोग्य, दृष्टीदोष आणि डोळ्यांची योग्य निगा राखण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. बाई रतन घरडा हॉस्पिटल, लोटे यांच्या वतीने डॉ. वाजे यांनी विद्यार्थ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांचे आरोग्य, आहार-विहार, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैली याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. योगिता डेंटल कॉलेज, खेड यांच्या वतीने डॉ. सुर्वे यांनी विद्यार्थ्यांची दातांची तपासणी केली. दातांची स्वच्छता, योग्य पद्धतीने दात घासणे, दातांचे विकार टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि नियमित दंत तपासणीचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या तिन्ही विभागांमध्ये विद्यार्थ्यांची नियोजनबद्ध पद्धतीने तपासणी करण्यात आली. केवळ तपासणीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. संतुलित आहार, स्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी आणि चांगल्या आरोग्यदायी सवयी यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या आरोग्य महाशिबिराप्रसंगी घरडा केमिकल्स प्रा. लि. चे सी.एस.आर. विभागाचे प्रतिनिधी बापूराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुख्याध्यापक वसंत यादव, शिक्षक कृष्णकांत कुंभार, राजेंद्र बांबाडे, गणेश सावर्डेकर, संतोष शिंदे, रुपेश धाडवे यांच्यासह विद्यालयातील इतर शिक्षक उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वितेसाठी घरडा केमिकल्स प्रा. लि. यांनी मुख्य आयोजक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विविध वैद्यकीय संस्थांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तपासणी विभाग, आवश्यक सुविधा आणि शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून संपूर्ण तपासणी प्रक्रियेत सहकार्य केले. ‘निरोगी विद्यार्थी, सशक्त समाज आणि उज्ज्वल भविष्य’ असा संदेश देणारे हे आरोग्य महाशिबिर सुवर्ण महोत्सवी वर्षातील एक महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम ठरले. घरडा केमिकल्स प्रा. लि. यांचे सहकार्य, तिन्ही वैद्यकीय संस्थांचा सक्रिय सहभाग आणि विद्यालयाच्या शिक्षकांचे उत्कृष्ट नियोजन यामुळे हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.












