सर्वंकष विद्यामंदिरात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न!

रत्नागिरी : कसोप येथील सर्वंकष विद्यामंदिर (एस. व्ही. एम.) प्रशालेचा पाचवा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६-२७ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध खेळांमधून आपले क्रीडाकौशल्य, जिद्द, चिकाटी आणि सांघिक भावना यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

या महोत्सवाचे आयोजन तीन टप्प्यांत करण्यात आले होते. २६ नोव्हेंबर रोजी पहिल्या दिवशी पूर्वप्राथमिक विभागातील चिमुकल्यांसाठी विविध मनोरंजक आणि आकर्षक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. २७ नोव्हेंबर रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तर २८ नोव्हेंबर रोजी इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या.

या महोत्सवात लंगडी, डॉजबॉल, रस्सीखेच, फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट आणि हँडबॉल या सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये गोळाफेक, लांब उडी, ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर धावणे, ४०० मीटर, रिले आदी स्पर्धांचा समावेश होता. सर्व स्पर्धा इंटर हाऊस पद्धतीने घेण्यात आल्या. मंगळयान (रेड), गगनयान (ब्लू), लिओ (यल्लो) आणि फिनिक्स (ग्रीन) या चार हाऊसमधील विद्यार्थ्यांनी विजयासाठी चुरशीची लढत दिली. प्रत्येक खेळात विद्यार्थ्यांनी उत्साह, शिस्त आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले.

या महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष गौरविण्यात आले. इयत्ता पाचवी आणि सहावी या गटातून उत्कृष्ट अॅथलिट म्हणून शौर्य जगुष्टये आणि दुर्वा जाधव यांची निवड करण्यात आली. इयत्ता सातवी ते आठवी या गटातून पार्थ आपटे आणि सांची भोंगले, तर इयत्ता नववी ते बारावी या गटातून युवराज मयेकर आणि इंश्रा काझी यांना उत्कृष्ट अॅथलिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चारही हाऊसमधील विद्यार्थ्यांच्या एकत्रित कामगिरीच्या आधारे सर्वसाधारण विजेतेपदासाठी चुरस रंगली. इयत्ता पहिली ते चौथी या गटात यल्लो हाऊस (लिओ) ने सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक पटकावला, तर इयत्ता पाचवी ते बारावी या गटात गगनयान ( ब्ल्यू हाऊस ) ने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्या हाऊसना चषक देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या स्पर्धांनंतर पालकांसाठीही विविध मनोरंजक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रस्सीखेच, क्रिकेट आणि लगोरी या खेळांमध्ये पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि खेळाचा मनमुराद आनंद लुटला. पालकांच्या सहभागामुळे क्रीडा महोत्सवातील उत्साह आणि जल्लोष अधिकच द्विगुणित झाला.

उद्घाटनप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका जैस्वाल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते, असे सांगितले. विजयाइतकेच पराभवातून शिकणेही महत्त्वाचे असून प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तम खेळाडू बनण्याचा प्रयत्न करावा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका मोनिका जैस्वाल आणि पर्यवेक्षिका झेबा परकार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षकांसह सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.