फलक वाचूनही रस्त्यावर फेकला जातोय कचरा
परिसरात दुर्गंधी; वाहनधारकातून नाराजी
पाटपन्हाळे (वार्ताहर) गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळी शहराच्या प्रवेशद्वारावरच रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेला दिसून येतो. या कचऱ्याच्या ढीगामुळे वाहनधारकांना व नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
शृंगारतळी शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक लोक शृंगारतळी शहरात राहायला येत आहेत. शृंगारतळी बाजारपेठेत खरेदी विक्री व अन्य कामासाठी तसेच गुहागर पर्यटन स्थळ असल्याने पर्यटक या मार्गाने येतात. मात्र प्रवाशांचे आणि पर्यटकांचे स्वागत गुहागरकडे जाताना शृंगारतळी शहराच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्याकडेला कचऱ्याच्या ढिगारे पाहून होत आहे. ग्रामपंचायतीने फलक लावला आहे.
तरीही काही नागरिक काळोखाचा आसरा घेऊन याच ठिकाणी कचरा टाकताना पाहायला मिळतात. हाच कचरा कुत्रे आणि मोकाट जनावरे अन्नाच्या शोधात रस्त्यावर पसरवतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. अशा उघड्यावर कचरा टाकणाऱ्या लोकांवर संबंधित ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांना व नागरिकांतून होत आहे.











