रत्नागिरी | प्रतिनिधी : चतुरंगच्या चिपळूण आणि रत्नागिरी केंद्रांचा वर्धापनदिन याच महिन्यात साजरा झाला. त्या निमित्ताने आणि मराठी राजभाषा दिन, स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी, कविवर्य कुसुमाग्रज जयंती, कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीचा टप्पा… अशा माय मराठी भाषा विषयक समयोचित सांस्कृतिक पार्श्वभूमीवर, दिनांक २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी चतुरंग प्रतिष्ठानने, महाराष्ट्रातील आघाडीचे ज्येष्ठ कवी, लेखक, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांचे ‘साहित्यातील दीपस्तंभ’ अशा शीर्षकाखाली एक विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.
मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी प्रवीण दवणे यांचे योगदान सर्वश्रुत आहे. रसिकांना खिळवून ठेवणारा संवाद, रसिकांच्या मनाचा ठाव घेणारं वक्तृत्व, याचबरोबरीने सदैव जागृत असलेले सजगसे कविमन… अशा अनेक गोष्टींचा अनुभव श्रोत्यांना घेता येणार आहे.
दि.२७ फेब्रुवारी रोजी चिपळूण येथे होणारे व्याख्यान शहरातील मध्यवर्ती ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता, तर दि. २८ रोजी रत्नागिरीत होणारे व्याख्यान रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे सभागृह येथे सायंकाळी ६.३० वाजता सुनिश्चित करण्यात आले आहे.
जाणत्या चिपळूणकर – रत्नागिरीकर साहित्यप्रेमी रसिकांसाठी ही एक फार छान पर्वणी असणार आहे.
त्यामुळे एका दर्जेदार आणि श्रवणीय व्याख्यानाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक रसिक श्रोत्यांनी आपल्या आप्तेष्ट मित्रमंडळींसह आपापल्या सोयीच्या ठिकाणी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठानने आपल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.