सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे हाहाकार : नद्या नाले तुंबले

 

सावंतवाडी बाजारपेठेत गुडघाभर पाणी : व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान 

रस्ते पूल पाण्याखाली : वाहतूक ठप्प 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरासह तालुक्यात रविवारी सकाळपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने अक्षरशः हाहाकार उडाला. संततधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवनही विस्कळीत झाले. तर सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेत गुडघाभर पाणी तुंबल्याने बाजारपेठेतील तब्बल वीस ते पंचवीस दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

नगर पालिका प्रशासनाने गटारांची सफाई न केल्याने हा प्रकार उद्भवल्याची नाराजी व्यापारी तसेच नागरिकांनी केली.

सावंतवाडी तालुक्यात रविवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेत अचानक पाणी तुंबले. शहरातील गांधी चौक परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे या भागातील रस्त्यालगतच्या सर्व दुकानांमध्ये पाणी शिरून आतील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अचानकपणे पाणी साचल्याने व्यापारी व नागरीकांची मोठी तारांबळ उडाली.

शहरातील हॉटेल चंदूभुवन समोरील व बाजूच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. रविवार आठवडा सुट्टी असल्याने काही दुकाने बंद होती. त्यामुळे त्यांचे नेमके किती नुकसान झाले ते कळू शकले नाही. तर काहींची दुकाने उघडी असल्याने मोठा अनर्थ टळला.

संततधार पावसामुळे या भागात पाणी साचते याची कल्पना लोकांना होती. तरीही या वेळेच्या पाण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा चारपट जास्त होते. अचानक पाणी वाढत गेल्याने दुकानदारांना दुकानातील सामान सुरक्षित स्थळी ठेवण्यासही अवधी मिळाला नाही. त्यामुळे बाजारातील होलसेल दुकानदार आर एस मुंज, श्री. वागळे, श्री. पोकळे तसेच बाळकृष्ण कोल्ड्रिंक, जय अंबे बेकरी, गवत मार्केट शेजारील पेडणेकर बुक स्टॉल तसेच सिताराम पेडणेकर व गजानन करमळकर यांच्या मिठाच्या दुकानातही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.

सखल भागात सगळीकडेच पाणी असल्याने सामान दुसरीकडे हलवणे ही मुश्किल झाले होते. पेडणेकर बुक स्टॉलमध्ये पाणी शिरल्याने पुस्तके आदी सामानाचे मोठे नुकसान झाले. तर गजानन करमळकर यांच्या मिठाच्या दुकानात पाणी गेल्याने मिठाची पोती भिजून गेली.

चिखलयुक्त पाणी दुकानात शिरल्याने दुकानांमध्ये सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते. अखेर दुकान मालकांनी दुकानातील पाणी उपसा करून बाहेर टाकले. रविवार असल्याने बऱ्याच व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती. त्या दुकानांमध्येही पाणी घुसले.

पालिका मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी येऊन पाहणी करत पालिका कर्मचाऱ्यांमार्फत तुंबलेले गटार खुले करण्याचा प्रयत्न केला. जवळपास दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तुंबलेले पाणी ३ वाजेपर्यंत ओसरले नव्हते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी जाऊन पाणी निचरा करण्याचा प्रयत्न केला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटार साफ करण्याकडे झालेले दुर्लक्ष तसेच शहरात चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले बांधकाम लक्षात घेता आजची ही परिस्थिती ओढवली असा आरोप अनेक व्यापाऱ्यांकडून करण्यात आला.

दरम्यान, नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या दोन घरावर डोंगराचा मातीचा काही भाग कोसळला. सावंतवाडी पालिकेची पाईपलाईन फुटल्यामुळे हा प्रकार घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र, त्या ठिकाणी राहणारे रांगोळी कलाकार सलाम तहसीलदार आणि गणेश मूर्ती कलाकार तुषार कुडपकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नरेंद्र डोंगरावरील निसर्ग भ्रमंतीसाठी डोंगराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या टिकीट केंद्रावर झाड कोसळून वनकर्मचारी गंभीर जखमी झाला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विद्याधर शंकर सावंत (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. ते माजी सैनिक असून सामाजिक वनीकरण मध्ये कार्यरत आहेत. त्यांना तात्काळ येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांचे सहकारी अशोक गावडे व उत्तम कदम यांनी त्यांना बाहेर काढले.

सावंतवाडी तालुक्याचा एकूणच विचार करता यावर्षीच्या हंगामातील सर्वाधिक मोठा पाऊस असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले होते. बांदा दाणोली मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले. ग्रामीण भागातील रस्त्यावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने त्या भागातील वाहतूकही काही काळ खोळबली होती. तालुक्यातील तळवडे बाजारपेठेतही पुराचे पाणी साचले होते. तर शहरातील काही भागातील नाल्यावरही पाणी आल्याने त्या त्या भागातील मार्ग बंद पडले होते. तर नदीकाठची शेती पूर्णतः पाण्याखाली गेली होती. दुपारनंतर पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पाणी ओसरले यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली.

 

चौकट

राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांकडून मदतकार्य

 

सावंतवाडी शहरातील परिस्थिती लक्षात घेता माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी परिस्थितीचा आढावा घेत नुकसानीची पाहणी केली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित, वैभव म्हापसेकर, संजू मुद्राळे आदींनी पाणी घुसलेल्या दुकानातील सामान बाहेर काढण्यास मदत केली. बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नाही याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तर प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा ही यावेळी दिसून आली नाही.

 

मालवणकर यांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान..

 

सावंतवाडी शहरातील चिटणीस नका परिसरामध्ये सकाळ कार्यालयाच्या पाठीमागून जाणाऱ्या नाल्यातील पाणी तेथील सहदेव मालवणकर यांच्या घरात शिरल्याने घरातील तुमची सामानाचे मोठे नुकसान झाले गुडघाभर पाणी घरात असल्याने मालवणकर यांना दुःख अनावर झाले. पालिकेच्या चुकीच्या बांधकामाचा फटका बसल्याचे मालवणकर यांनी सांगितले.