रत्नागिरी । प्रतिनिधी :शहरातील माळनाका येथे दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात निवृत्त शिक्षक दत्तप्रसाद वासुदेव गोडसे (77, रा. सन्मित्रनगर, रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रविवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.10 वा. सुमारास घडली. याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष वासुदेव सोनार (40,रा.सनगरेवाडी कोतवडे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत दत्तप्रसाद गोडसे यांचा मुलगा यशोधन दत्ताप्रसाद गोडसे (50,रा.सन्मित्रनगर,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी 8.10 वा. सुमारास त्यांचे वडील माळनाका येथील हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी जात होते. त्याचवेळी संतोष सोनार हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एयु-2615) घेउन एसटी स्टँड ते मारुती मंदिर असा भरधाव वेगाने जात होता. तो माळनाका येथील गांधी पेट्रोल पंपासमोर आला असता रस्ता ओलांडणार्या दत्तप्रसाद गोडसे यांना त्याच्या दुचाकी धडक बसली. यात दत्तप्रसाद गोडसे रस्त्यावर उपडे पडल्याने त्यांच्या नाकातोंडातून रक्त येउन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर करत आहेत.











