खेड रेल्वेस्थानक छप्पर दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडला

खेड(प्रतिनिधी)

खेड रेल्वेस्थानक परिसरातील सुशोभिकरणासह स्थानक परिसरातील कॉक्रिटीकरणाचे काम चर्चेचा विषय बनले आहे. पहिल्याच मुसळधार पावसात सुशोभिकरण कामातील गळती अन् रस्ता कॉंक्रिटीकरणाला नव्याने ‘ठिगळं लावण्याच्या प्रक्रियेने १० कोटी रुपये खर्चुन केलेल्या कामाचा सुमार दर्जा समोर आला आहे. सातत्याने टीकेची झोड उठल्यानंतर सुशोभिकरण कामातील छप्पर बसवण्यासाठी अखेर यंत्रणेला मुहूर्त मिळाला. शुक्रवारपासून छताचे काम हाती घेण्यात आले आहे.

थो-थो पाऊस कोसळल्यानंतर खेड रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामातील छप्परासाठी अखेर मुहूर्त मिळाल्याने गळती थोपण्याची आशा प्रवासी बाळगून आहेत.

सुशोभिकरणातील स्थानक परिसरात जिकडे-तिकडे पाणीच पाणी वाहते. या पाण्यातूनच रेल्वेगाड्यांतून येणाऱ्या प्रवाशांना मार्गक्रमण करावे लागते. आधीच
सुशोभिकरण कामाचे धिंडवडे निघालेले असतानाच त्यात कामही अपूर्णावस्थतेच होते.

टीकेचा भडीमार झाल्यानंतर प्रशासन पुन्हा जागे झाले आहे. सुशोभिकरण कामातील छप्पराचे काम प्रलंबित राहिले होते. अखेरीस हे काम हाती घेण्यात आले असून यामुळे तरी गळती थांबेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.