पावसाळ्यानंतर पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी; नवीन पुलांसाठी निधी मिळावा
ग्रामस्थांची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी):- तालुक्यातील बहुतांश पुलांवरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. यामध्ये पाली- निरबाडे, निरबाडे-काडवली, पिंपळीखुर्द, शिरगाव यासह अनेक पुलांवर खड्डेच खड्डे असल्याने पुलावर जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. तरी या पुलांवरील खड्डे तात्पुरते बुजविण्यात यावीत. तर पावसाळ्यानंतर या जुन्या पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करून पुलांच्या नवीन बांधकामांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.
चिपळूण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांच्या पुलांवरून धोकादायक वाहतूक सुरू आहे. यामध्ये पाली-निरबाडे पुलाला देखील काही वर्षे झाली असून या पुलाले लोखंडी रेलींग तुटून पडली आहेत. तसेच या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. वाहन चालविताना अंदाज चुकल्यास वाहन नदीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी खाजगी वाहन चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी पुलाजवळ रस्त्याच्या बाजूला घसरली होती. सुदैवाने ही गाडी नदीत कोसळली नाही. अन्यथा अनर्थ घडला असता. यामुळे या पुलावरून वाहने चालविणे जिकरीचे बनले आहे. पावसाळ्यात तर या पुलावरील खड्ड्यानी डोके वर काढले असल्याने येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून खड्डे बुजवले आहेत. मात्र, पावसाळ्यानंतर या पुलाच्या कामाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच निरबाडे- काडवली मार्गावरील पुलाची देखील दुरावस्था झाली आहे. दिनांक २१ जुलै २०२१ च्या महापुरात या पुलाचा जोडरस्ता वाहून जाण्याबरोबरच रेलींगचे काही भाग तुटून गेले आहे. पुलाचा जोडरस्ता करण्यात आला असला तरी तर पुलावर खड्डे पडले असल्याने चिखलमय पुलावरून वाहने चालविणे कठीण होऊन बसले आहे. चिपळूण ते काडवली, धामणंद पंधरागावकडे जाणारा हा मार्ग जवळचा असला तरी या दोन्ही पुलांवरून वाहतूक करणे वाहन चालकांना धोकादायक बनले आहे तरी पावसाळ्यानंतर या पुलांच्या कामाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.
तसेच दसपटी विभागासह खडपोली औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या पिंपळी – नांदिवसे मार्गावरी पुलासह संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या पुलावर तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कॅनलवरील पुलावर देखील हीच परिस्थिती आहे. एकंदरीत पुलांवरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिरगाव येथील पुलावर देखील खड्डे असून २०२१ च्या महापुरानंतर स्ट्रक्चर ऑडिटनंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर वाहतूक दुसरीकडून वळविण्यात आली होती. मात्र, आता या पुलावरून वाहतूक सुरू आहे. तर दुसरीकडे अलोरे येथे नवीन पुलासाठी निधी उपलब्ध होऊन नवीन पूल बांधण्यात देखील आला. मात्र, धोकादायक म्हणून समोर आलेल्या पुलासाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चौकट
“पिंपळी-नांदिवसे रस्त्यावरचे खड्डे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच”– मुराद अडरेकर
चिपळूण तालुक्यातील पिंपळी-नांदिवसे रस्त्यावरचा पुलासह संपूर्ण रस्त्यांची अवस्था अतिशय भयावह झाली असून जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्याचा वापर दररोज हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला करत असूनही संबंधित विभाग व प्रशासन यांचे याकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे, ही अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह बाब आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी दिली आहे. ते पुढे म्हणतात की, मान्सून सुरू झाल्यापासून या रस्त्यांवर वाहतूक धोकादायक झाली आहे. अनेक ठिकाणी अपघात होत असून, वाहनधारकांचे तसेच पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. पुलाच्या दुरवस्थेमुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
हा केवळ दुरुस्तीचा प्रश्न नाही, तर प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा आणि जनतेविषयीच्या असंवेदनशीलतेचा गंभीर मुद्दा आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास स्थानिक जनतेच्या रोषाला तोंड द्यावे लागेल, याची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवावी, असे अडरेकर यांनी यावेळी नमूद केले. या रस्त्यांच्या त्वरित दुरुस्तीची आणि पुलाच्या मजबुतीकरणाची ठोस पावले उचलावीत. अन्यथा येत्या काळात जनतेसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुराद अडरेकर यांनी दिला आहे.













