पुनस ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
संतोष कोत्रे lलांजा कायम रहदारी असलेल्या देवधे ते पावस या मार्गावर बेदरकारपणे होणाऱ्या अवजड चिरे वाहतुकीमुळे पादचारी आणि शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला असून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी पुनस ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संतोष लिंगायत यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून देवधे पावस ते लांजा कोर्ले तिठा यादरम्यान मोठ्या प्रमाणात अवजड चिरा वाहतूक केली जात आहे. चिरा घेऊन जाणारी अवजड वाहने अतिशय वेगाने चालवली जात असून त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहन चालक त्याचप्रमाणे पादचारी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
देवधे पावस या मार्गावरून दररोज कामानिमित्त ये-जा करणारे पादचारी त्याचप्रमाणे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची ये-जा असते. अशावेळी धोकादायकपणे सुरू असणारी अवजड वाहतूक एखाद्याच्या मृत्यूस देखील कारणीभूत ठरू शकते. इतकी बेदरकारपणे आणि बेफिकीरपणे ही अवजड वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आणि म्हणूनच अशी बेदरकारपणे आणि धोकादायकरित्या केल्या जाणाऱ्या वाहतुकीवर कार्यवाही व्हावी अशी मागणी पुनस ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष लिंगायत यांनी केली असून याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार यांना सादर केले आहे. त्यामुळे तहसीलदार याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.











