अर्जुना नदी पात्रा लगत चिंचबांधनजीक असलेली ती वास्तू हे पुरातन सुर्यमंदिरच

सकल हिंदू समाजाचा दावा

व्यापक भूमिका मांडण्यासाठी २२ ऑगस्टला धर्मसभेचे आयोजन

राजापुरात पत्रकार परिषदेत दिली माहिती

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर शहरातील अर्जुना नदी पात्रा लगत चिंचबांधनजिक असलेली ती वास्तू हे पुरातन सुर्यमंदिरच असल्याचे मिळालेल्या विविध दाखल्यांवरून स्पष्ट होत आहे. या मंदिराला आक्रमणापासून वाचविण्यासाठी व्यापक स्वरूपात लढा उभारण्याशिवाय आता पर्याय नसल्याची भावना सकल हिंदू समाजाची झाली आहे. यासाठी दिनांक २२ ऑगस्टला राजापूर, शिवतीर्थ येथे विराट धर्मसभेचे आयोजन करण्यात आले असून या धर्मसभेमध्ये संबंधित सूर्य मंदिराबाबत व्यापक भूमिका मांडली जाईल अशी माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी राजापूर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने महेश मयेकर यांनी ही भूमिका मांडली.
फेब्रुवारी महिन्यात राजापूर शहरातील अर्जुना नदीकाठानजिक असलेल्या वास्तुवरून मोठा संघर्ष झाला होता. सदरची वास्तू ही पुरातन सूर्यमंदिर असल्याचा दावा सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला होता. त्याबाबत शनिवारी राजापूर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन ते सूर्यमंदिरच असल्याचे ठामपणे सांगण्यात आले. सदर मंदिराची बांधणी ही सातवाहन राजवटीतील असल्याचे दिसत असून मंदिरावरील कोरीवकामामध्ये दिसून येणा-या शंख, कमळ, भारवाहक हत्ती, फणाधारी नाग, धनुष्य वगैरे नक्षीकाम इत्यादि बाबी या हिंदू स्थापत्य शैलीच्या आहेत. अशी चिन्हं श्री धूतपापेश्वर मंदिराचे बांधणीत देखील आहेत असेही नमुद करण्यात आले.
तसेच सदर वास्तूसंबंधी सापडून आलेल्या देवनागरी लिपीतील मराठी-संस्कृत मिश्रभाषेतील शिलालेखामध्ये शालिवाहन शके १७०७ या वर्षातील विश्वावसु संवत्सरातील ज्येष्ठ शुध्द सप्तमी म्हणजेच १४ जून इसवीसन १७८५ रोजी सदर मंदिराची निर्मिती केली अगर मंदिर दातार वंशातील व्यक्तीकडून पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
त्याचप्रमाणे त्या मंदिराचा उल्लेख राजापूर शहरातील जुने जाणते नागरिक, निवृत्त शिक्षक तसेच स्वातंत्र्यसैनिक कै. प्रभाकर द. मराठे, रा. शिवाजीनगर, गुजराळी यांनी सन २०१५ चे मानाने लिहीलेल्या “राजापूरचा इतिहास” या पुस्तकामध्ये देखील प्रकाशचित्रासह सुर्यमंदिर म्हणूनच करण्यात आलेला आहे. राजापूर शहरातील ज्येष्ठ हिंदू नागरिकांपैकी अनेकांनी सदर मंदिरात असणा-या पिंडीचे तसेच मुर्तीचे दर्शन घेतलेले असल्याची माहिती नागरिक सांगतात असेही यावेळी नमुद करण्यात आले.
या पुरातन हिंदू मंदिराचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून फेब्रुवारी २०२५ मध्ये झाल्यानंतर जाणीवपूर्वक त्या ठिकाणी उरुस कार्यकम आयोजित करण्यात आला ही वस्तुस्थिती आहे. त्यापूर्वी तेथे कधीही उरुस कार्यक्रम करण्यात आलेला नव्हता.असे सकल हिंदू समाजाचे म्हणणे असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
त्यावेळी प्रशासनाचा बंदी आदेश झुगारुन मंदिर असलेल्या या वास्तूवर काहींनी आक्रमण करुन त्यास हिरवा रंग लावून, त्यावर नूर आलम दर्गा असा संपूर्णपणे चुकीचा बोर्ड लावून आजवर कधीही न झालेला उरुस कार्यक्रम केला. यामुळे राजापूर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या भावना प्रचंड दुखावल्या आहेत. सदर कृत्याबाबत राजापूर पोलिसांनी संबधितांवर गुन्हा दाखल केलेला आहे.
भारतीय पुरातत्व खात्याकडून सदर मंदिर वास्तूची पहाणी व परिक्षण करण्यात येऊन त्यास संरक्षित स्मारक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून मार्च २०२५ मध्ये लेखी निवेदन मा. सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, रत्नागिरी यांचेकडे देण्यात आले होते. मात्र त्यानुसार आजवर पुरातत्व विभागाकडून पहाणी करण्यात आलेली नाही तसेच सदर पत्राला आजवर कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. यामुळे देखील सकल हिंदू समाज अतिशय व्यथित झालेला आहे.
राजापूर येथे सुर्यमंदिर नसल्याचे विधान विधीमंडळात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केल्याचे सकल हिंदू समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यामुळे देखील सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मात्र असे विधान विधीमंडळात करण्यापूर्वी हिंदुत्ववादी पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री यांनी एकदा या सूर्यमंदिराची वास्तू पाहिली असती तर त्यांना सुर्यमंदिर आहे की नाही हे समजले असते असेही यावेळी नमुद करण्यात आले. एकीकडे पालकमंत्र्यांनी विरोधी भूमिका मांडली असतानाच दुसरीकडे राजापूरच्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकेबाबतसुध्दा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
यामुळे आता हे हिंदू मंदिर आक्रमणापासून वाचविण्यासाठी लढा उभारण्याशिवाय अन्य पर्याय सकल हिंदू समाजाकडे शिल्लक राहिलेला नाही अशी सकल हिंदू समाजाची धारणा बनली आहे. त्यासाठी सकल हिंदू समाज एकवटला असून राजापूर शिवतीर्थ येथे २२ ऑगस्ट २०२५ रोजी विराट धर्मसभेचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये संबंधित सूर्य मंदिराबाबत सविस्तर माहिती दिली जाईल अशी मोठी घोषणा सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला सकल हिंदु समाजाचे महेश मयेकर, राजेंद्र कुशे, रमेश गुणे, श्रीकांत ताम्हनकर, विवेक गुरव, संदीप तेरवणकर, दीपक गुरव, निकेश पांचाळ आदीसंह हिंदू बांधव उपस्थित होते.
फोटो 2 आरजेपी 4
राजापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना महेश मयेकर याप्रसंगी राजेंद्र कुशे, रमेश गुणे, श्रीकांत ताम्हनकर व अन्य.