फुरूस ग्रामपंचायत सरपंच निवडणूक स्थगित

रत्नागिरी, दि. 21 ऑगस्ट –
खेड तालुक्यातील फुरूस ग्रामपंचायतीची सरपंच निवडणूक अखेर स्थगित करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाकडे प्रलंबित असलेल्या अपील प्रकरणामुळे निवडणुकीस तात्पुरता अडथळा आला आहे.

सदर प्रकरणी मा. ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यासमोर दाखल करण्यात आलेल्या अपील प्रकरणाची सुनावणी दि. 06 ऑगस्ट 2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली होती. या सुनावणीत अपीलदाराचे वकील, प्रतिवादी क्रमांक 2 व 3 तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्यक्ष हजर होते. संपूर्ण युक्तिवादानंतर प्रकरण अंतिम आदेशासाठी बंद ठेवण्यात आले असून, ग्रामविकास मंत्र्यांनी मौखिक निर्देश देत अंतिम आदेश होईपर्यंत स्थित्यंतर कायम ठेवण्याचे आदेश दिले.

यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि. 31 जुलै 2025 रोजी तहसीलदार, खेड यांना निवडणुकीसंदर्भात आदेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांनी 18 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस देत 21 ऑगस्ट रोजी सरपंच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र ग्रामविकास मंत्र्यांच्या स्थित्यंतर आदेशानुसार आजची निवडणूक स्थगित करण्याचे माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी तहसीलदारांना कळविले असून, त्यानुसार सर्व सदस्यांना लेखी स्वरूपात निवडणूक स्थगितीबाबत माहिती देण्यात आली आहे.

या निर्णयाबाबत स्पष्ट करण्यात आले आहे की स्थगिती ही फक्त सरपंच निवडणुकीपुरती असून मूळ अपील प्रकरण ग्रामविकास विभागाकडे अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानेही यासारख्या निवडणूक प्रकरणांवर स्थगिती देत पुढील सुनावणीची तारीख 30 सप्टेंबर 2025 निश्चित केली आहे.

त्यामुळे फुरूस ग्रामपंचायतीची सरपंच निवडणूक तात्पुरती थांबली असून पुढील आदेश येईपर्यंत प्रलंबित राहणार आहे.