दोडामार्ग l प्रतिनिधी : बेळगाव येथून गोवा राज्याकडे मांसाची वाहतूक करणाऱ्या एका स्विफ्ट कारला तिलारी येथे पुलाजवळ मुख्य रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी जाळल्याची घटना घडली आहे. कारमध्ये मांस असल्यामुळेच ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तिलारी घाटातून बेळगाव-गोवा मार्गावरून मांस भरलेली ही स्विफ्ट कार जात असताना तिळारी येथील पुलाजवळ मुख्य रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी ती अडवून पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक नयोनी साटम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. कारमध्ये मांस नेमके कोठून आणले होते आणि ते कोणत्या ठिकाणी घेऊन जात होते याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
बेकायदेशीर मांस वाहतुकीच्या संशयातून ही आग लावण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असला तरी, पोलीस या घटनेच्या सर्व बाजूंनी तपास करत आहें











