दत्त जयंती निमित्त रोटरी क्लबचे आयोजन
वैभववाडी l प्रतिनिधी : करूळ गावठण येथे दत्त जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 190 जणांची तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब वैभववाडी, रोट्रॅक्ट सांगुळवाडी व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध उपलब्ध करून देण्यात आले. कसाल येथील कोलते हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत कोलते व डॉ. दर्शना कोलते यांनी रुग्णांची तपासणी करत मार्गदर्शन केले.
यावेळी करूळ सरपंच नरेंद्र कोलते, वैभववाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन रावराणे, सचिव नामदेव गवळी, रोटरीयन संतोष टक्के, संजय रावराणे, माजी उपसरपंच सचिन कोलते, दत्त देवस्थान मंडळ अध्यक्ष संतोष साटम, सचिव बाळासाहेब कोलते, बबन डकरे, अमर कांबळे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कोलते हॉस्पिटल यांच्या वतीने गेली सोळा वर्षे करुळ गावामध्ये दत्त जयंती निमित्त शिबिराचे आयोजन करण्यात येते. गावातील व परिसरातील रुग्णांची यावेळी तपासणी करून त्यांना मोफत औषध पुरवठा हॉस्पिटल मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या शिबिरात 190 जणांची तपासणी करण्यात आली. तर 150 जणांची मधुमेह तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर दहा जणांची कॉम्प्युटरद्वारे फुफ्फुस तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी ग्रामपंचायत करूळ, दत्त देवस्थान व दत्त प्रगती मंडळ करुळ यांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ. प्रशांत कोलते म्हणाले, गावामध्ये आरोग्य सेवेची वारी यापुढेही सुरूच राहील. प्रत्येक व्यक्तीने स्वतः च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ताप येत असल्यास कोणीही दुर्लक्ष करु नये. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. असे सांगितले. सरपंच नरेंद्र कोलते, संतोष टक्के, सचिन रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाळासाहेब कोलते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोलते हॉस्पिटल कसाल, करूळ गावठण वाडीतील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.












