सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांची शिताफी
वैद्यकीय खर्चासाठी रचला घरफोडीचा कट
पुण्यात शिवणे परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घरफोडी प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. लंगडत चालण्याचा बहाणा करत बुरखा घालून आलेल्या व्यक्तीने तब्बल ३९.३० लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीपर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे आरोपी हा फिर्यादीचाच नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले आहे. वैद्यकीय उपचारासाठी पैशांची गरज असल्याने त्याने हा कट रचल्याची कबुली दिली आहे.
पुणे : शिवणे परिसरातील एका कुरिअर कंपनीच्या मालकाच्या घरात १९ डिसेंबर रोजी बुरखा घालून व लंगडत असल्याचे भासवत घरफोडी करण्यात आली होती. या घटनेत साडेचार लाख रुपयांचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण ३९.३० लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर बुरखाधारी व्यक्ती महिला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. फुटेजमध्ये ही व्यक्ती ऑटोरिक्षाने पळून जाताना दिसून आली. त्यानंतर वारजे माळवाडी पोलिसांच्या पथकाने ऑटोरिक्षावर लक्ष केंद्रित करत तपासाची दिशा ठरवली.
तपासादरम्यान संबंधित ऑटोरिक्षाची नंबर प्लेट लाल फितीने झाकलेली असल्याचे आढळून आले. सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनाची माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांना रिक्षामालकाचा शोध घेण्यात यश आले, अशी माहिती वारजे माळवाडी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत कायंगडे यांनी दिली.
रिक्षामालकाने नांदे रोड परिसरातील एका व्यक्तीने ऑटोरिक्षा उधार घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, बुरखा घालून घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली. विशेष म्हणजे हा आरोपी फिर्यादीचा नातेवाईक असल्याचेही तपासात स्पष्ट झाले.
कुटुंबातील जुने वाद आणि वैद्यकीय उपचारासाठी पैशांची गरज यामुळे आरोपीने घरफोडीचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार आणि त्याचे कुटुंबीय घरात नसल्याची संधी साधत, बुरखा घालून व लंगडत असल्याचा बहाणा करत आरोपीने घरात प्रवेश केला आणि चोरी केली. पुढील तपासासाठी आरोपीला उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती प्रहार डिजिटल ने दिली आहे.













