​जनता विद्यालय तळवडे येथे स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

संदीप गावडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव

​चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे फेडले पारणे

सावंतवाडी । प्रतिनिधी : जनता विद्यालय तळवडे येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संदिप गावडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध शैक्षणिक उपक्रमांत व स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
​ ​कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेल्या चित्रकला आणि रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन. श्री. गावडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींमधून त्यांची कल्पकता आणि मेहनत दिसून आली, ज्याचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.

​ ​प्रमुख पाहुणे संदिप गावडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, “शिक्षण केवळ पुस्तकी न राहता कला आणि क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्य विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवते.” यावेळी विविध स्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
​मान्यवरांची उपस्थिती
​या सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी लाभली होती. व्यासपीठावर सिंधुदुर्ग परिवहन विभागाचे काळे साहेब, जनता विद्यालय प्रशाला संस्थेचे अध्यक्ष श्री. पेडणेकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, तळवडे सरपंच सौ. मेस्त्री, दादा परब, भूषण पेडणेकर, आणि निळकंठ नागडे आदि मान्यवर उपस्थित होते.
​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद लुटला.