खेड (प्रतिनिधी): – जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन शिक्षण विभाग, पंचायत समिती खेड यांच्या वतीने आज दिनांक ३० डिसेंबर २०२५ व उद्या ३१ डिसेंबर २०२५ असे दोन दिवस करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून क्रीडांगणावर चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
या हिवाळी क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने मोलाचे सहकार्य केले आहे. स्पर्धेच्या कालावधीत खेळाडूंना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे झोन सेक्रेटरी ला. अनिल मोरे यांच्या वतीने दोन दिवसांसाठी मुलांना पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. तसेच लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सदस्य आणि वेरळ येथील हॉटेल मनीषाचे मालक ला. विवेक कदम यांच्या सहकार्याने स्टेजसाठी साऊंड सिस्टीम तसेच खेळाडूंना बसण्यासाठी मंडपाची सोय करण्यात आली आहे.
या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख मा. श्री. सचिन धाडवे साहेब, दस्तूर येथील उद्योजक मा. बावाशेठ चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी खेड गटविकास अधिकारी मा. श्री. गणेश मंडलिक साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी मा. श्री. विजय करपे साहेब तसेच गटशिक्षण अधिकारी मा. विजय दाजी बाईत यांनी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख केला. जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य सेवा, क्रीडास्पर्धांचे आयोजन अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी सातत्याने समाजासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष ला. महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष तथा डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी ला. सुरेश चिकणेसर, झोन सेक्रेटरी ला. अनिल मोरे आणि ला. विवेक कदम यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.












