लांजा भटवाडी शाळा ते कोत्रेवाडी पर्यंत स्ट्रीट लाईटची सुविधा कधी मिळणार? नागरिकांचा सवाल

गेल्या दहा वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार व मागणी करूनही दुर्लक्ष

लांजा (प्रतिनिधी) लांजा साटवली मार्गावर शहरातील भटवाडी शाळा ते कोत्रेवाडी या साधारपणे दिड किमीच्या अंतरात स्ट्रीट लाईटसाठी केवळ प्रतीक्षाच करावी लागली आहे. येथील नागरिकांना गेली दहा वर्षे सातत्याने पत्रव्यवहार व मागणी करूनही स्थानिक नगरसेवकांच्या अनास्थेमुळे हा प्रश्न आजवर सुटलेला नाही. नव्याने निवडून आलेले नगरसेवक हा प्रश्न मार्गी लावणार का ?असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे
लांजा भटवाडी शाळा ते कोत्रेवाडी या साधारणपणे दिड किमीच्या अंतरामध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात काळोखाचे साम्राज्य असते. आजूबाजूला जंगलमय भाग असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा देखील संचार सुरू असतो. कोत्रेवाडी, कोंडये पालये वाडी येथून लांजा येथे येणारे कामगार, महिलावर्ग रात्रीच्या वेळी घरी जात असतो. मात्र या ठिकाणी काळोखाचे साम्राज्य असल्याने भीतीचे वातावरण असते. विशेषता महिला वर्गासाठी यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे दररोज सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. मात्र या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने मोठी समस्या जाणवते.
लांजा साटवली या मुख्य रस्त्यावर असलेल्या लांजा भटवाडी शाळा ते कोत्रेवाडी यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा जंगल भाग आहे. सध्या बिबट्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली असून मुक्त संचार सुरू आहे. अशा परिस्थितीत कामा धंद्याच्या निमित्ताने ये जा करणारे महिला, पुरुषवर्ग यांना स्ट्रीट लाईट नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांना काळोखातूनच ये- जा करावी लागते.
यासाठी कोत्रेवाडी नागरिकांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने स्ट्रीट लाईट किंवा अन्य लाईट व्यवस्था करावी या मागणीचे निवेदन अनेकदा
स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनाला दिलेले होते.
मात्र त्याबाबत दहा वर्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आजही हा प्रश्न खितपत पडून आहे. त्यामुळे राजकीय, प्रशासकीय अनास्था की जाणीवपूर्वक दुर्लक्ष ? असा सवाल कोत्रेवाडीतील नागरिकानतून केला जात आहे .
दरम्यान, नव्याने निवडून आलेले नगरसेवक योगेश कावतकर यांनी तरी हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आता केली जात आहे