राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी गुरूवारी निवडणूक

अध्यक्षपदी एड. शशिकांत सुतार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राजापूर प्रतिनिधी राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून गुरूवारी २९ जानेवारी रोजी या पदासाठी निवडणूक होणार आहे. राजापूर अर्बन बँकेवर सहकार पॅनेलची निर्वीवाद बहुमताने सत्ता असून पुढील एक वर्षाच्या अध्यक्षपदासाठी संचालक एड.शशिकांत सुतार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर उपाध्यक्षपदाचे नाव गुरूवारी जाहिर केले जाणार आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे.
राजापूरचे सहाय्यक निबंधक संतोषकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी ठिक ११.३० वाजता, राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. राजापूर, शाखा राजापूर, नवाळे कॉम्प्लेक्स, या शाखेच्या प्रशिक्षण सभागृहामध्ये ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे.
सकाळी ११.३० ते ११.४० अर्ज सादर करणे, ११.४५ ते ११.५५ अर्जांची छाननी, त्यानंतर यादी वाचून दाखवीणे व त्यानतंर आवश्यकता असल्यास निवडणूक घेणे असा कार्यक्रम होणार आहे.
अर्बन बँकेवर सत्तास्थानी असलेल्या सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या वतीने अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एक वर्षाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आलेला आहे. आपली एक वर्षाची मुदत संपल्याने बँकेचे अध्यक्ष संजय ओगले व उपाध्यक्ष विजय पाध्ये यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. या रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवडणूक होत आहे.
अध्यक्षपदासाठी यापुर्वीच एड. शशिकांत सुतार यांचे नाव निश्चित करण्यात आले असुन उपाध्यक्ष पदासाठी अद्याप नाव निश्चित करण्यात आलेले नाही. ते गुरूवारी जाहिर करण्यात येणार आहे. या दोन्ही पदावर बिनविरोध निवड होणार आहे.