खेडमध्ये अवैध धंदे जोरात, प्रशासनाची डोळेझाक

खेड (प्रतिनिधी) – खेड शहरासह संपूर्ण तालुक्यात सध्या सर्वत्र राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याचे चित्र ठळकपणे समोर येत आहे. ठिकठिकाणी मटका, जुगार, पत्त्यांचे क्लब तसेच गावठी दारूची खुलेआम विक्री सुरू असून दिवसेंदिवस या धंद्यांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. शहरापुरतेच नव्हे तर शहरालगतच्या गावांमध्येही हे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले असून संबंधित धंदेवाल्यांची मस्ती आणि धिटाई दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पत्त्यांचे क्लब बंद दाराआड सुरू असून रात्री उशिरापर्यंत तेथे जुगार खेळवला जात असल्याचे बोलले जात आहे. या क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असून तरुणांसह मध्यमवयीन नागरिकही या जुगाराच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. काही पत्त्यांचे क्लब कायद्याला बगल देत हे प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या सर्व अवैध धंद्यांतील संबंधित लोक उघडपणे “आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही, आमचे हप्ते आहेत,” असे सांगताना दिसत असल्याचेही गंभीर आरोप होत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, मुंबई–गोवा महामार्गावर रात्रीच्या वेळेस सुरू असणाऱ्या टपऱ्यांमधूनही अवैध प्रकार सुरू असल्याचे वास्तव आहे. पूर्वी केवळ गुटखा विकणाऱ्या टपऱ्यांमधून आता दारूसह अन्य अमली पदार्थांची विक्री होत असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळी या टपऱ्यांवर बारप्रमाणे लोक बसून दारू पिताना दिसत असून, विशेष म्हणजे ड्राय डेच्या दिवशीही शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून खेड तालुक्यात राजरोसपणे दारू विक्री सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यातील इतर भागांमध्ये उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई होत असताना, खेड तालुक्यात मात्र अशी कोणतीही ठोस कारवाई पोलीस विभागाकडून होत नसल्याचे चित्र आहे. शहरालगतच्या मोकळ्या मैदानाचा वापरही तळीरामांकडून दारू पिण्यासाठी केला जात असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो.
काही दिवसांपूर्वी खेड शहरात एका सामाजिक संस्थेच्या वतीने डेमो विमानांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमापूर्वी पत्रकार आणि अधिकाऱ्यांसाठी घेतलेल्या डेमो शोदरम्यान त्या मैदानावर पडलेल्या दारूच्या बाटल्या पाहून उपस्थितांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी “खेड पोलीस करतात तरी काय?” असा थेट सवाल उपस्थितांकडून करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर तळीराम, पत्त्यांचे क्लब चालक आणि इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर खेड पोलीस ठोस कारवाई करणार का, की अवैध व्यवसायिकांच्या म्हणण्यानुसार “हप्ते वेळेवर जातात, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही,” असेच हे प्रकार सुरू राहणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या तालुक्यात गुटख्याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, हा गुटखा शेजारील तालुक्यातून खेडमध्ये आणला जात असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे या अवैध धंद्यांना नेमके अभय कोणाचे, असा सवाल आता नागरिकांमधून जोर धरू लागला आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यावर कधी ठोस पावले उचलणार, याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.