तळवली पंचायत समिती गणात भाजपची प्रचारात आघाडी

जिल्हा परिषदेसाठी डॉ.राजेंद्र पवार तर पंचायत समितीसाठी मंगेश जोशी रिंगणात

गुहागर | प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. तळवली पंचायत समिती गणात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मतदारांकडून भरघोस पाठिंबा मिळत आहे.
शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून युतीकडून भाजपने आपला उमेदवार रिंगणात उतरवताना उच्चशिक्षित व वैद्यकीय सेवेत अग्रेसर असणारे डॉ. राजेंद्र पवार हे प्रथमच निवडणूक रिंगणात आहेत.तर तळवली पंचायत समिती गणातून भाजपने माजी आम.डॉ. विनय नातू यांचे विश्वासू सहकारी व कारूळ गावचे माजी सरपंच मंगेश जोशी यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.दोन्ही उमेदवार कारूळ गावातील आहेत.मात्र दोन्ही उमेदवारांचा आपल्या मतदार संघात अतिशय चांगला प्रभाव असल्याने भाजपच्या या दोन्ही उमेदवारांना अतिशय चांगला प्रतिसाद येथील मतदारांकडून मिळत आहे.
डॉ. राजेंद्र पवार हे गेली अनेक वर्षे आरोग्य सेवेत अग्रेसर राहिले आहेत.कोरोना काळात देखील त्यांनी अतिशय उत्तम सेवा दिली आहे. मंगेश जोशी यांनी देखील अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.दोन्ही उमेदवार जनतेच्या परिचयाचे व सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेले असल्याने तळवली पंचायत समिती गणात भाजपने प्रचारात चांगली मुसंडी मारली आहे.