खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी तायक्वाँडो संघ व तायक्वाँडो असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वाँडो अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये खेड येथील एलटीटी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या प्रसाद प्रभाकर गाडीलोहार याने सुवर्णपदक पटकावत खेड तालुक्याचे नाव उज्ज्वल केले.
रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधून ५०० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये एलटीटी स्कूलच्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करत एक सुवर्ण व दोन रौप्यपदके मिळवली.
एलटीटी स्कूलकडून प्रथमेश प्रभाकर गाडीलोहार, प्रसाद प्रभाकर गाडीलोहार आणि सत्यजित दिनकर गाडीलोहार यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये प्रसाद गाडीलोहार याने सुवर्णपदक मिळवले, तर प्रथमेश आणि सत्यजित यांनी रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
या यशामागे क्रीडाशिक्षक व तायक्वाँडो प्रशिक्षक कृणाल चव्हाण आणि पंचशील चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष अहमद मुकादम, परवेज मुकादम, माजिद खतीब, जयेश गुहागरकर, प्रेमळ चिखले, चंद्रकिरण वैद्य, पुष्कर नेने, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पंकजा कुडाळकर, माध्यमिकचे मुख्याध्यापक गुरुनाथ सारंग तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.










