न्यू इंग्लिश स्कूल लांजा ६६०१ क्रमांकाच्या केंद्रांवर १३ शाळांमधील ६६७ विद्यार्थी परीक्षेस बसणार

लांजा (प्रतिनिधी): दहावीची बोर्ड परीक्षा शुक्रवारी २० फेब्रुवारीपासून सुरू होत असून न्यू इंग्लिश स्कूल लांजा या ६६०१ क्रमांकाचे केंद्रांवर क्रमांक परीक्षा पार पडणार असून या केंद्रावर तालुक्यातील १३ शाळांमधील एकूण ६६७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत परीक्षा घेतली जाणार आहे.बैठक क्रमांक B011800 ते B024515 असे आहेत. तसेच मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
मंडळाच्या निर्देशानुसार सर्व परीक्षा कक्षांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था प्रशालेच्या नवीन इमारतीत करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
केंद्र संचालक वाघाटे एम. ए. यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून उपकेंद्रसंचालक म्हणून सय्यद एम. ए. व रवींद्र वासुरकर हे काम पाहणार आहेत. विद्यार्थ्यांनी हॉलतिकीटासह परीक्षा केंद्रावर किमान ४५ मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रसंचालक वाघाटे एम. ए. यांनी केले आहे.