देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगरपंचायतीची घरपट्टी मागणी रु. ६१,०२,४०३/- व पाणीपट्टीची रु.४८,६८,०५०/- मागणी असून, त्यापैकी आजपर्यंत घरपट्टी सुमारे ८२ टक्के व पाणीपट्टी ७५ टक्के वसुली पूर्ण झाली आहे. मात्र शासनाने ९५ टक्के वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, अनुदान मिळण्यासाठी ही अट अनिवार्य ठेवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाच स्वतंत्र पथके तयार करून वसुली मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान थकीत कर असलेल्या नागरिकांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. थकबाकीदार करदात्यांचे नळ कनेक्शन तोडण्याची, गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी तातडीने आपली कररक्कम भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, शासनाच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे दि. १ एप्रिल २०२६ पासून थकीत घरपट्टी व पाणीपट्टीवर दरमहा २ टक्के दंड आकारला जाणार आहे.
नागरिकांवर हा आर्थिक भार पडू नये तसेच ९५ टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे, यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. देवरुख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी सर्व करदाते व गाळाधारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी तसेच गाळा भाडे तात्काळ भरून नगरपंचायतीस सहकार्य करावे. अन्यथा २५ मार्च २०२६ पासून दंडात्मक कारवाईसह नळ कनेक्शन तोडण्याची कार्यवाही नाईलाजाने करावी लागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.












