राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील शिवणे बुद्रुक येथील आरसीसी पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या महत्त्वपूर्ण विकासकामामुळे गावातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. तर या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील अनेक ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाला शिवणे बुद्रुक गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. भूमिपूजनानंतर बोलताना आमदार किरण सामंत यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. “शिवणे बुद्रुक गावातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही,” असे नमूद केले.
दरम्यान, आमदार किरण सामंत यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन शिवणे बुद्रुक येथील अनेक ग्रामस्थांनी त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे शिवसेना पक्षाची ताकद परिसरात अधिक वाढणार असून, आगामी काळात गावातील विविध विकासकामांना गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले, सभापती नंदिनी कदम, जि. प. सदस्य प्रतिक मटकर, पं. स. सदस्य उमेश पराडकर, चंद्रकांत जानस्कर, माजी जि. प. सदस्य आबा आडिवरेकर यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाच्या बातम्या विकास कामावर प्रेरित होऊन शिवणे बुद्रुक वासियानी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत...












