रत्नागिरी: हातखंबा तिठ्यावर विना नंबरचा आयशर ट्रक पलटी

महामार्गावरील वाढत्या वेगाचा पुन्हा एकदा प्रत्यय!

रत्नागिरी : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर वाढलेल्या वाहनांच्या वेगाचा आणखी एक गंभीर परिणाम हातखंबा परिसरात समोर आला आहे. भरधाव वेगातील विना नंबरचा नवा आयशर ट्रक शनिवारी मध्यरात्री हातखंबा तिठावरील रवी इन्फ्रा बिल्ड प्रोजेक्ट कंपनीच्या प्लांटसमोर रस्त्याकडेला पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली, तरी महामार्गावरील वाढत्या वेगामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रत्नागिरीहून हातखंब्याकडे जाणारा हा आयशर ट्रक शनिवार, ९ मे रोजी मध्यरात्री 2.30 वा. सुमारास हातखंबा तिठा परिसरात आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या बाहेर जाऊन गटारासाठी खोदण्यात आलेल्या चरीत पलटी झाला. अपघातानंतर ट्रकच्या डाव्या बाजूचा भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला आहे. विशेष म्हणजे, अपघाताला दोन दिवस उलटूनही संबंधित ट्रक मालकाकडून वाहन बाहेर काढण्यासाठी कोणतीही ठोस हालचाल करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पलटी झालेला ट्रक अद्याप घटनास्थळीच पडून असून, परिसरातील वाहनचालक आणि नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त आयशर ट्रकवर कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नसल्याचा धक्कादायक प्रकार घटनास्थळी समोर आला आहे. संबंधित ट्रक अगदी नवीन असल्याचे दिसून येत असून, नंबर प्लेटशिवाय वाहन रस्त्यावर कसे धावत होते, याबाबतही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकारामुळे वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातग्रस्त आयशर ट्रकवर नंबर प्लेट नसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता आरटीओ प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.