रिव्हर्स घेताना अंदाज चुकला; डंपर 35 फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

खेड | प्रतिनिधी:
खेड तालुक्यातील सुकवली येथील खडी क्रशर परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात डंपर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रिव्हर्स घेत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने डंपर सुमारे 30 ते 35 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून रोजी सकाळी सुमारे 11.40 वाजण्याच्या सुमारास डंपर क्रमांक MH 08 W 8471 हा सुकवली परिसरातील खडी क्रशर येथे काम करत असताना चालकाने वाहन रिव्हर्स घेतले. मात्र, रिव्हर्सचा योग्य अंदाज न आल्याने डंपर अचानक रस्त्यालगतच्या सुमारे 30 ते 35 फूट खोल दरीत कोसळला. अपघात इतका गंभीर होता की चालकाला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली तैनात असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांची 24 तास विनामूल्य अपघात मदत रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी जखमी चालकाला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती चालक नितीन विजय पवार (वय 27, रा. चिंचघर-दस्तुरी) यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.