देवगड, प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देवगड तालुका भाजपाचे माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रभाग क्रमांक १४ मधील एका गरजू कुटुंबाला नवीन घर बांधून देत अनोखी भेट दिली आहे.
देवगड-जामसंडे शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये राहणारे चंद्रकांत दत्तात्रय धोपटे, मालती चंद्रकांत धोपटे आणि देवता चंद्रकांत धोपटे यांचे घर पावसाळ्यात उध्वस्त झाले होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना नवीन घर बांधणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन योगेश पाटकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने त्यांच्यासाठी नवीन घर उभारून दिले.
या समाजोपयोगी कार्याबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी योगेश पाटकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सुनील धोपटे, गिरीश धोपटे, विजय धोपटे, रामचंद्र धोपटे, कृष्णा भुजबळ, प्रितेश डोंगरे, प्रकाश बाणे, श्रेयश धोपटे, सुरेश थोटम, सुहास बावकर, सीमा सावंत, प्रज्ञा धोपटे, अवंतिका भिडे, सानवी धोपटे आणि अनिल आपटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गरजू कुटुंबाला निवाऱ्याचा आधार देत योगेश पाटकर यांनी केलेल्या या कार्याचे परिसरात कौतुक होत असून, समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.













