दापोली (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा खेड-दापोली-मंडणगड मतदारसंघाचे आमदार नामदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली व मंडणगड तालुक्यात युवासेनेच्या तालुकानिहाय आढावा बैठका उत्साहात पार पडल्या. आगामी संघटनात्मक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.
बैठकीस युवासेना कार्यकारिणी सदस्य चेतन सातोपे, रायगड लोकसभा युवासेना सरचिटणीस उमेश खताते, युवासेना दापोली विधानसभा बीएलए समन्वयक सुमित जाधव तसेच युवासेना उपजिल्हाधिकारी अमित पारदुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी एस.आय.आर. संदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच युवासेना बीएलए नियुक्त्या, सदस्य नोंदणी अभियान, बूथस्तरावरील संघटनबांधणी आणि पक्षविस्तार यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात युवासेनेची ताकद अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व युवासैनिकाने सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत उपस्थित युवासैनिकांनी संघटनात्मक कामकाजाबाबत सूचना मांडल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी नियोजन करण्यात आले. दापोली व मंडणगड तालुक्यात युवासेनेचे जाळे अधिक प्रभावीपणे विस्तारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.












