सातारा – स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी आज सातारा प्रांताधिकारी कार्यालयात महायुतीचे उमेदवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “आमच्याकडे असलेल्या मतदानापेक्षा अधिक मते मिळवून महायुतीचा उमेदवार विजयी होईल. २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत आम्ही सांगत असलेला आकडा शंभर टक्के दिसून येईल.”
ते पुढे म्हणाले की, सर्व मतदारांनी महायुतीवर विश्वास दाखवला असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे तिन्ही पक्ष एकसंघपणे काम करत आहेत. “महायुतीमध्ये कोणतेही मतभेद किंवा अडचणी नाहीत. शंभूराज देसाई, मकरंद पाटील, उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेते एकत्रितपणे निवडणुकीची प्रक्रिया पार पाडत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
महायुतीचा उमेदवार अपेक्षेपेक्षा अधिक मतांनी विजयी होईल, असा विश्वासही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.












