लोणावळा: पुणे जिल्ह्यातील ट्रेकर्सचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या लोहगड किल्ल्यावर एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गडावर गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा फोटो काढताना पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अग्रवाल (वय २४)असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, केतन हा आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी गुरुवारी सकाळी लोहगड किल्ल्यावर गेला होता. गडावर फिरताना आणि फोटो काढताना तो दरीलगतच्या भागात उभा राहून पोझ देत होता. मात्र, पावसामुळे निसरडा झालेल्या भागात त्याचा तोल गेला आणि तो थेट खोल दरीत कोसळला.ही घटना डोळ्यादेखत घडताच त्याच्या होणाऱ्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला.
स्थानिक पर्यटकांनी तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि मावळ वन्यजीव पथक घटनास्थळी दाखल झाले.
अत्यंत दुर्गम आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून केतनला दरीतून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे, केतन आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे लग्न येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार होते. कुटुंबीयांनी लग्नासाठी जयपूरमधील तब्बल १७ कोटी रुपयांचा आलिशान पॅलेस बुक केला होता. तसेच पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था देखील करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.ज्या मुलीसोबत नवीन आयुष्याची स्वप्ने रंगवली होती, तिच्याच वाढदिवशी काळाने केतनवर घाला घातला. त्यामुळे आनंदाचे क्षण क्षणार्धात दुःखात बदलले असून अग्रवाल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या बचावकार्यात आदिती गायकवाड, वैष्णवी भांगरे, सचिन गायकवाड, विशाल पिसे, सागर दळवी, कुणाल कडू, सागर कुंभार, योगेश साखरे, सपना कराळे, राजू कडू, योगेश दळवी, महेश मसणे आणि सुनील गायकवाड यांनी मोलाची कामगिरी बजावली.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लोहगड परिसरासह संपूर्ण मावळ भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.












