“वांगी एक्सप्रेस” – कोकणच्या खाद्यसंस्कृतीची एक कहाणी

कोकणच्या खाद्यपरंपरेत अनेक पदार्थांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी तेल वांगी हा पदार्थ विशेष लोकप्रिय मानला जातो. मसाल्यांचा सुगंध, तेलाचा मुरलेला स्वाद आणि कोवळ्या वांग्यांचा नैसर्गिक गोडवा यांचा सुरेख संगम या पदार्थात अनुभवायला मिळतो. इतका की जेवताना नकळत चार घास जास्त जातात.

या अवीट चवीमागे राजापूर तालुक्यातील गोवळ गावाचा मोठा वाटा आहे. या परिसरात पिकणारी लहान, टपोऱ्या आकाराची वांगी अनेक दशकांपासून रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेमुळे त्यांची मागणी केवळ राजापूरपुरती मर्यादित न राहता मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा शहरांपर्यंत पोहोचली आहे. कोकणात येणारे पर्यटक आणि माहेरच्या चवीची ओढ जपणाऱ्या माहेरवाशिणी यांच्या माध्यमातूनही या वांग्यांची ख्याती दूरवर पसरली.

आजही गोवळ परिसरातील अनेक महिला आपल्या शेतातील ताजा माल टोपल्यांत भरून एस.टी. बसने राजापूर बाजारपेठेत आणतात. लाल परीतून होणाऱ्या या नियमित प्रवासामुळे स्थानिकांनी या बसला प्रेमाने “वांगी एक्सप्रेस” हे नाव दिले आहे. गावाकडच्या सुपीक मातीतून निघालेली ही वांगी बाजारात पोहोचतात आणि तेथून असंख्य घरांच्या स्वयंपाकघरात आपले स्थान निर्माण करतात.

राजापूर बाजारपेठेतील “वांगी बोळ” हा या परंपरेचा जिवंत साक्षीदार आहे. अनेक वर्षांपासून येथे महिला टोपल्यांतून वांग्यांचे वाटे मांडून विक्रीसाठी बसतात. या सातत्यपूर्ण व्यवहारामुळेच या परिसराला “वांगी बोळ” अशी ओळख मिळाली.

या साऱ्या व्यवहारामागे केवळ खरेदी-विक्री नसते, तर जिव्हाळ्याची एक सुंदर परंपराही दडलेली असते. एखाद्या ग्राहकाने वाटा घेतला की प्रेमापोटी दोन-चार वांगी अधिक घालून देण्याची प्रथा आजही अनेक ठिकाणी दिसून येते. “घ्या, खावा!” या साध्या शब्दांतून व्यक्त होणारा आपुलकीचा भाव कोकणच्या माणुसकीचे सुंदर दर्शन घडवतो. व्यवहारापेक्षा नात्यांना अधिक महत्त्व देणारी ही संस्कृतीच या बाजारपेठेचे खरे वैशिष्ट्य आहे.

पूर्वी प्रसिद्ध असलेली पारंपरिक गोवळच्या वांग्याची मूळ जात आज अस्तित्वात नाही. काळाच्या ओघात त्या बियाण्यांचा लोप झाला; मात्र या भागात आज पिकणारी वांगी त्या समृद्ध परंपरेची वारसदार ठरली आहेत. म्हणूनच ग्राहकांच्या मनात आजही त्यांची ओळख “गोवळची वांगी” अशीच कायम आहे.

विशेष म्हणजे हीच कोवळी वांगी तेल वांग्यांसाठी सर्वोत्तम मानली जातात. मात्र झाडावर अधिक काळ राहिलेली काही फळे आकाराने मोठी होतात. साधारण २५० ते ३०० ग्रॅम वजनाची ही वांगी भरीतासाठी अत्यंत योग्य समजली जातात. चुलीवर भाजलेल्या अशा वांग्यांपासून तयार होणाऱ्या भरीताचा धुरकट स्वाद आणि सुगंध मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो. त्यामुळे या भागातील उत्पादन म्हटले की तेल वांग्यांची लज्जत आणि भरीताची चव या दोन्ही गोष्टी एकत्र आठवतात.

आज अशाच योग्य, ताज्या आणि टपोऱ्या वांग्यांपासून बनविलेल्या भरली वांग्यांचा आस्वाद घेण्याचा योग आला. प्रत्येक घासागणिक चव खुलत गेली आणि जेवणाची रंगत वाढत गेली. त्या स्वादासोबत गोवळच्या शेतकऱ्यांची मेहनत, बाजारपेठेत बसलेल्या महिलांची आपुलकी आणि कोकणच्या सुपीक मातीतून आलेला सुगंधही मनात दरवळत राहिला. नकळत चार घास अधिक गेले आणि त्या प्रत्येक घासातून कोकणच्या खाद्यपरंपरेचा जिवंत अनुभव मिळाला.

गोवळची वांगी ही केवळ एक भाजी नाही. ती कोकणच्या भूमीची ओळख, शेतकऱ्यांच्या कष्टांची साक्ष, बाजारपेठेतील जिव्हाळ्याची परंपरा आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या खाद्यसंस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. ताटात वाढलेल्या तेल वांग्यांसोबत केवळ चव येत नाही; तर त्यामागे उभा असलेला इतिहास, माणुसकीचा ओलावा, “वांगी एक्सप्रेस”ची रंजक परंपरा आणि कोकणच्या जीवनशैलीचा सुगंधही अनुभवायला मिळतो. म्हणूनच ही वांगी केवळ पोट भरत नाहीत, तर मनालाही कोकणच्या मातीशी पुन्हा एकदा जोडून ठेवतात.

धनंजय मराठे, राजापूर