खेड (प्रतिनिधी) : शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित सिद्धीयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी यश महेंद्र जैन याने ९.२७ सीजीपीए गुण मिळवत मुंबई विद्यापीठात सातवा क्रमांक प्राप्त केला आहे.
यश जैन यांच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्राचार्य, प्राध्यापकवृंद आणि सहविद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, पालकवर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून यश जैन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे सिद्धीयोग विधी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
यश जैन यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यात अधिकाधिक विद्यार्थी उच्च शैक्षणिक यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहित होतील, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.












